भिवंडी पालिकेत २५४ कर्मचाऱ्यांच्या भरतीस राज्य शासनाची मंजुरी

भिवंडी पालिकेत २५४ कर्मचाऱ्यांच्या भरतीस राज्य शासनाची मंजुरी

भिवंडी । मागील कित्येक वर्षे आकृतिबंध मंजूर नसल्याने भिवंडी महानगरपालिकेतील कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली होती. तब्बल २१ वर्षांनी राज्य शासनाने आकृतिबंध मंजूर करीत पालिका आस्थापना वरील विविध २५४ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने बुधवारी त्या संदर्भातील अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी पत्रकारांना दिली आहे.या भरतीमुळे मनपा अस्थापनांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून तब्बल सतरा वर्षानंतर राज्य शासनाने मनपात भरती संदर्भातील निर्णयाचे पालिका आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
भिवंडी मनपा आस्थापनेवर ४३६३ पदे मंजूर असल्याचा अहवाल मनपा प्रशासनाने शासनास दिला होता.

या भरती संदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. भिवंडी महानगरपालिकेची स्थापना दिनांक १६ डिसेंबर २००१ रोजी झाली असून सध्या ड वर्ग महानगरपालिका म्हणून शासन दरबारी नोंद आहे.२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७ लाख ९ हजार ६६५ आहे. त्यामध्ये मागील अकरा वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन त्याचा ताण पालिका व्यवस्थापना वर पडत होता.

पालिकेत २००५ मध्ये २७९ पदांच्या भरती नंतर कोणतीही नव्याने भरती न केल्याने पालिकेत नोकर भरती ठप्प होती.दरम्यान अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाल्याने उरलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने आकृतिबंध मंजूर करावा म्हणून कर्मचारी शासनाकडे मागणी करीत होते .पालिका प्रशासनाने २००७ व २०१९ रोजी शासनाकडे पाठविलेला आकृतिबंध मंजूर न केल्याने पदोन्नती व नवी नोकर भरती रखडली होती. दरम्यान भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती.

मात्र तिचा योग्य तसा पाठपुरावा कोणी करीत नव्हते. आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हि मागणी लावून धरली असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केली. त्यामुळे मनपा आस्थापनेवरील ताण निश्चितच कमी होणार आहे, असे सांगत आपण मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

First Published on: December 1, 2022 10:01 PM
Exit mobile version