अपघाती मृत्यू नव्हे तर शशिकांत वारिशेंची झाली हत्या; राज्य सरकारची कबुली

अपघाती मृत्यू नव्हे तर शशिकांत वारिशेंची झाली हत्या; राज्य सरकारची कबुली

काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला. चारचाकी वाहनाची धडक वारिशे यांच्या दुचाकीला बसल्याने यामध्ये वारिशे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, हा अपघाती मृत्यू नसून हे सर्व जाणीवपुर्वक करण्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले होते. पण आता या प्रकरणाची राज्य सरकारकडून खळबळजनक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत लेखी उत्तर दिले आहे.

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा आज विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना पत्रकार वारिशे यांची हत्या झाल्याची राज्य सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारिशे हे कायमच ‘महानगरी टाईम्स’ या वृत्तपत्रातून नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत बातम्या प्रसिद्ध करायचे.

पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पावरून एक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमध्ये त्यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांचा फोटो देखील छापला होता. याच्या काही तासांतच वारिशे यांच्या दुचाकीला अपघात झाला. वारिशेंच्या दुचाकीला ज्या चारचाकी वाहनाने धडक दिली, ते वाहन आंबेरकर यांची असल्याची माहिती मिळताच या प्रकरणात आंबेरकर याला पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आली होती.

दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पंढरीनाथ आंबेरकर स्थानिकांना धमक्या देत असल्याचे वारिशे यांनी आपल्या बातमीमध्ये लिहिले होते. या लेखानंतर काही दिवसांतच वारिशे यांचा अपघात घडवून आणण्यात आला होता. राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर थार गाडीनं वारिशे यांच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली असून सध्या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, नव्या पेन्शन योजनेत…

महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे पीए रमेश नार्वेकर यांची चौकशी झाली आहे. पत्रकार वारिशे प्रकरणातील आरोपी आंबेरकर आणि रमेश नार्वेकर यांच्यामध्ये वारंवार संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: March 17, 2023 4:16 PM
Exit mobile version