विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी नियम बदलाच्या हालचाली, निवड आवाजवी मतदाने करण्याचा प्रयत्न

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी नियम बदलाच्या हालचाली, निवड आवाजवी मतदाने करण्याचा प्रयत्न

लोकसभा, राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी, यासाठी विधानसभा नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा अध्यक्ष प्रस्तावाद्वारे निवडला जावा, असा आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. विधिमंडळाच्या गेल्या दोन अधिवेशनात अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याचे आघाडी सरकारने टाळले आहे. आता तर अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने व्हावी, अशी तरतूद महाराष्ट्र विधानसभा नियमात आहे. अलीकडच्या काळात १९९९ मध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष निवड बिनविरोध झाली. आता लोकसभा, राज्यसभेच्या धर्तीवर अध्यक्ष निवड करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानपरिषदेत प्रस्ताव आणून निवड केली जाते. हीच पद्धत विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राबवण्याचा सरकारचा हेतू आहे.

अध्यक्ष निवडीला का घाबरता? : फडणवीस

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे संख्याबळ आहे, मग घाबरताय का? असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सत्ताधाऱ्यांना विचारला. हात वर करुन का होईना, पण घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर,अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

First Published on: July 15, 2021 10:54 PM
Exit mobile version