राज्य सरकारचा माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

राज्य सरकारचा माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

प्रसारमाध्यमं त्यांचं काम करत होते. फार गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करतंय. गेल्या दोन वर्षांपासून असे प्रकार सुरू आहेत. अशी दंडुकेशाही योग्य नाही. याबाबत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लालबागच्या राजाची आज प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्त्पूर्वी परिसरातील दुकानं पोलिसांनी बंद केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर मुंबई पोलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली. त्यानंतर दुकानं सुरु झाली. मात्र, त्यानंतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी अत्यंत त्वेषाने अरेरावी केली. अधिकृत पास असतानाही निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत बाहेर जाण्यास सांगितलं. माध्यम प्रतिनिधींनी निकम यांना समजुतीने बोलण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांचा पारा आणखी चढला. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

अशी घडली घटना

लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेजसाठी पत्रकार जमले होते. त्यांच्याकडे अधिकृत प्रवेश पास होते. पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी अरेरावी सुरू केली. प्रवेश देणार नाही. दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की सुरू केली. त्यावेळी पत्रकारांनी निकम यांनी सबुरीने परिस्थिती हाताळण्याची विनंती केली. धक्काबुक्की करू नका, असं सांगितलं. त्यावेळी निकम म्हणाले की, हात काय, पायसुद्धा लावू शकतो.

First Published on: September 10, 2021 6:21 PM
Exit mobile version