करोना चाचणी स्वस्त झाली आता २२०० रुपयात होणार!

करोना चाचणी स्वस्त झाली आता २२०० रुपयात होणार!

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्य सरकारने करोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून चाचणीसाठी आता ४५०० ऐवजी २२०० रुपये मोजावे लागणार आहेत. आयसीएमआरने करोना चाचणीसाठी ४५०० हे शुल्क निश्चित केले होते, त्यानंतर हा दर रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार महाविकास आघाडी सरकारने करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याचे ठरवले आहे. यामुळे खासगी लॅबला मोठा दणका बसला असून या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आयसीएमआरने सर्व राज्यांना करोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले हे समितीचे सदस्य आहेत. या समितीने कोरोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सुपुर्द केला होता.

या अहवालानंतर राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत. खासगी लॅबमध्ये करण्यात येणार्‍या करोना चाचणीच्या शुल्कात सरकारने कपात केली आहे. पूर्वी करोना चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात होते. मात्र, आता २२०० रुपये आकारले जातील. कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
व्हीटीएमच्या माध्यमातून रुग्णालयामधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क घेतले जाईल. पूर्वी रुग्णालयात करोनाची चाचणी केली तर ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन चाचणी केल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होते, याकडे टोपे यांनी लक्ष वेधले.

First Published on: June 14, 2020 6:40 AM
Exit mobile version