ऑमिक्रॉनच्या नव्या संक्रमणाने धडकी , नव्याने निर्बंध

ऑमिक्रॉनच्या नव्या संक्रमणाने धडकी , नव्याने निर्बंध

दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातल्याने देशात आणि राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अ‍ॅमिक्रॉन ही चिंतेची बाब असून, देशात तिसर्‍या लाटेची भीती असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंतेत चांगलीच भर पडली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बैठक बोलावली आहे. तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नव्या उपाययोजनांबरोबरच नव्या निर्बंधाबाबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सामान्यांना धडकी भरवायला सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही विषाणूंच्या संक्रमणावर चिंता व्यक्त करत नव्याने निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत. भारतात वाढणारे कोरोना रुग्ण आणि विदेशात सापडलेल्या व्हेरियंटच्या संकटाने जगात भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याने राज्यातही सतर्कता बाळगली जात आहे. यामुळेच सुरू होऊ घातलेल्या लहान मुलांच्या शाळा सुरू करण्यास नाहरकत देण्यास आरोग्य विभागाने नकार दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील शाळा 1 डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संकट वाढू लागल्याचे स्पष्ट दिसू लागल्याने त्या सुरू केल्या जाणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. हा विषाणू, लसीला निष्प्रभ करून वाढतो. याचा नव्याने शोध करण्यात आला आहे. हा काळजी करण्यासारखा व्हेरियंट असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. या संकटानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी आफ्रिकेवरून येणारे विमान थांबवावे, अशी विनंती केली आहे. केंद्राने अद्याप निर्णय न घेतल्याने तिथे काय निर्णय होते याकडे आपचे लक्ष असल्याचे टोपे म्हणाले. मात्र, तूर्तास असा व्हेरियंट देशात आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवतोय. त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांना 72 तासांची आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाला आता लसीचे 2 डोस घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. लसींचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दोन लसींचा डोस घेणार्‍या नागरिकांनाच आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार आहे. तसेच विनामास्क ग्राहकांना 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहन, रिक्षा, टॅक्सीतून प्रवासादरम्यान प्रवाशाने मास्क घातला नसल्यास चालक आणि प्रवासी दोघांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुकानात जाणार्‍या ग्राहकाने मास्क घातला नसल्यास ग्राहकाला 500 तर दुकानदाराला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. तर मॉलमध्ये ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर थेट मॉल्स मालकांवर 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल. सभा, राजकीय क्रार्यक्रम, घरगुती कार्यक्रमांना परवानगी असेल. परंतु नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकावर 5० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होईल.

First Published on: November 28, 2021 4:11 AM
Exit mobile version