चायनीज फूड बंद करा- रामदास आठवले

चायनीज फूड बंद करा- रामदास आठवले

चीनने सीमेवर भारताविरोधात कुरघोडी केल्यावर चीन विरोधात देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देशभरात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. चीन धोका देणारा देश आहे. चायनीज फूड आणि देशातील चायनीज फूडची सर्व हॉटेल्स बंद करायला हवीत, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

भारताने चीनला बुद्ध दिला

भारताने चीनला बुद्ध दिला आहे. युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

लडाखमधील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना आठवेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत केंद्र सरकार आणि सर्व भारतीय आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहेत.

चिनी उपकरणावर बहिष्कार

दरम्यान, भारत-चीन सीमा वादात आता दूरसंचार मंत्रालयाने उडी घेत चिनी उपकरणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार मंत्रालयाने त्यांच्या अधिनस्थ असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तसेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला (एमटीएनएल) चिनी उपकरणांचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत.

First Published on: June 18, 2020 4:25 PM
Exit mobile version