टीईटी परीक्षेला बसलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे सवलतीच्या गुणांपासून वंचित

टीईटी परीक्षेला बसलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे सवलतीच्या गुणांपासून वंचित

शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी पाच टक्के गुणांची सवलत देण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. यासाठी २३ मार्चला दाखले सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे मुदतीमध्ये दाखले सादर न करू शकल्याने विद्यार्थ्याना सवलतीपासून वंचित राहावे लागले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने जानेवारीमध्ये टीईटी परीक्षा झाली. राज्यभरातून तब्बल ४ लाख ४३ हजार २८३ विद्यार्थी बसले होते. टीईटी परीक्षा अर्ज भरताना संबंधित जात प्रवर्गाची (एसईबीसी, ईडब्ल्यूएस) नोंद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देता यावे, यासाठी त्यांना दाखले सादर करण्यासाठी तसेच नावातील स्पेलिंग दुरुस्तीची सुविधा mahatet.in या संकेतस्थळावर २३ मार्चपर्यंत दिली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना हा बदल करणे शक्य झाले नाही, नावातील स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करण्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र तर गुण सवलतीसाठी जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन अपडेट करणे आवश्‍यक असल्याने आता या परिस्थितीत अडचणी येत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अनेकांना ते वेळेत करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना सवलतीच्या गुणांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सवलतीचे गुण मिळावेत यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनेकांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्यासंदर्भात पत्र पाठवली आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक


 

First Published on: April 14, 2020 4:17 PM
Exit mobile version