गेम खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील कंप्युटर्सचीच केली चोरी

गेम खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील कंप्युटर्सचीच केली चोरी

अटक

संगणकावर गेम खेळण्याच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांनी दोन संगणक संच शिक्षण घेत असलेल्या शाळेतूनच लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने दिघी पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना तीन आठवड्यांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण प्राथमिक विद्यालयात घडली आहे. विद्यार्थ्यांना बुधवार, १४ नोव्हेंबर रोजी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्यांना संगणकावर गेम खेळण्याचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारत संगणक लंपास केले होते.

दोन माजी विद्यार्थ्यांचाही समावेश

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आठवड्यांपूर्वी दोन माजी विद्यार्थी आणि यशवंत चव्हाण प्राथमिक विद्यालयात इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने संगणक लॅबमधून दोन संगणक संच चोरले. शनिवारी रात्री उशिरा दोन माजी आणि ९ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करत दोन संगणक संच लंपास केले. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेम खेळण्याच्या हव्यासापोटी चोरी

दरम्यान, पोलीस चौकशीत त्यांनी संगणकावर (कंम्प्युटर गेम) गेम खेळण्याच्या हव्यासापोटी चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक संगणक माजी विद्यार्थ्यांच्या घरी होता, तर दुसरा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा घरी होता. घरच्यांनी याविषयी जाब विचारला असता दोन हजार रुपयांना संगणक विकत घेतल्याचे पटवून दिले होते. माजी दोन विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेले असून हे सर्व जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडील दोन संगणक पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कामगिरी दिघी पोलीस ठाण्यावर वरिष्ठ अधिकारी विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या टीमने केली आहे.

First Published on: November 15, 2018 1:52 PM
Exit mobile version