तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे काही वर्षांपासून विद्यार्थांचा कल वाढत आहे. त्यातही पाच वर्षे अभ्यासक्रमापेक्षा तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी १६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी ४३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन वर्षे अभ्यासक्रमांसाठी सात हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी तर पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या अर्जात घट झाली आहे.

इंजिनियरिंग, डॉक्टर, फार्मसी या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा नेहमीच ओढा असतो. परंतु रोजगाराची संधी असलेल्या विधी अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागला आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी असलेल्या सुमारे १४ हजार जागांसाठी यंदा ४३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गतवर्षी हाच आकडा ३६ हजार ५१३ इतका होता. या तुलनेत पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी असलेल्या सुमारे नऊ हजार जागांसाठी यंदा १६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गतवर्षी हाच आकडा १८ हजार ११२ इतका होता. तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी साधारणत: तीन अर्ज तर पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी साधरणपणे दीड अर्ज आले आहेत. त्यामुळे तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी काही वर्षांपासून अधिक चुरस पाहायला मिळत आहे. पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला गतवर्षीच्या तुलनेत यंदा फारच कमी अर्ज आले आहेत. यंदा पाच वर्षीय अभ्यासक्रमाला यंदा गतवर्षीच्या तुलनेत १८०० कमी अर्ज आले आहेत. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेऊन राज्य सरकारकडून विधीच्या कॉलेजांनाही मान्यता दिल्याने जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

First Published on: November 10, 2020 4:19 PM
Exit mobile version