विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर… सर्वोच्च न्यायालयाने ठेवले नेमकेपणाने बोट

विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर… सर्वोच्च न्यायालयाने ठेवले नेमकेपणाने बोट

 

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असेत तर सर्व स्पष्ट झाले असते की तुमच्या बाजूने फुटलेले ३९ आमदार आहेत की नाही. त्यामुळे तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायला हवे होते, असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिम्हा या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, विश्वासदर्शक ठराव आला असता तर त्या फुटलेल्या आमदारांना समोर यावे लागले असते. त्यातील १६ आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस जारी झाली होती. त्यामुळे कदाचित ते विश्वासदर्शक ठरावात मतदान करु शकले नसते. आणि कदाचित तुम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला असतात, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

जे झाले त्यावर आम्ही काहीच करु शकत नाही, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. मात्र जर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव असेल तर ते निर्णय घेऊ शकत नाही. यावर पुर्नविचार करण्यासाठी तुम्ही हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर वर्ग करण्याची मागणी करत आहात. तुमची मागणी चुकीची आहे असे आम्ही म्हणत नाही. पण या वादग्रस्त मुद्द्यावर योग्य तो निर्णय व्हायला हवा, असे मतही न्यायालायाने व्यक्त केले.

तुम्हाला आमच्याकडून नेमके काय हवे आहे, अशी विचारणाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा जो शपथविधी झाला तो न्यायालयाने रद्द करावा, अशी मागणी ज्येष्ठ वकील सिंघवी यांनी केली.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना दिलेली अपात्रतेची नोटीस, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, शिंदे गटाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास ठराव यासह विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

हेही वाचाः … तर घोडेबाजार सुरू होईल; राज्यपालांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या सूचनेला सिब्बलांचा आरोप

First Published on: February 23, 2023 1:52 PM
Exit mobile version