दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्र सरकार.., इंधन दरवाढीवरून सुळेंचा मोदी सरकारला टोला

दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्र सरकार.., इंधन दरवाढीवरून सुळेंचा मोदी सरकारला टोला

जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्र सरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली.

लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज मांडला. केंद्र सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे, असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मागील काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासूनच इंधन दरात वाढ होण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

विरोधी पक्षांनी काल मंगळवारी या इंधन आणि स्वयंपाक गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ लोकसभेतून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनाचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी करत सभागृहावर बहिष्कार टाकला.


हेही वाचा : राज्यातील ‘सेतू सुविधा केंद्र’ तातडीने पूर्ववत करा, आमदार धिरज देशमुखांची मागणी


 

First Published on: March 23, 2022 7:10 PM
Exit mobile version