सुजितसिंह ठाकुरांचे लॉबिंग भाजपच्या महाराष्ट्र अध्यक्षपदासाठी चुरस

सुजितसिंह ठाकुरांचे लॉबिंग भाजपच्या महाराष्ट्र अध्यक्षपदासाठी चुरस

सुरजसिंह ठाकुर

राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात घालण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने भाजपतील नाराजी उघड झाली आहे. हे पद भाजपचे विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांना देण्यासाठी जोरदार मागणी होत होती. मात्र ते दरेकर यांना देण्यात आल्याने भाजपच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये तीव्र नाराजी उफाळून आली आहे. आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुजितसिंह ठाकूर यांची वर्णी लावण्यासाठी भाजपचा एक गट कामाला लागला आहे. मुंबई भाजपाध्यक्षपद मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आहे.

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपतील मतभेद कमालीचे वाढले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. पक्षातील निष्ठावंतांना डावलण्याचा हा फटका असल्याचे कारण देत या घटनांची चौकशी करण्याची मागणी या दोन नेत्यांनी केली होती.

आपल्या हाती सत्ता असताना फडणवीस यांनी एकहाती निर्णय घेतले आणि निष्ठावंतांना दूर ठेवत आयारामांकडे सूत्रे दिल्याचा आक्षेप या नेत्यांनी घेतला होता. नुकतीच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड पार पडली. या जागी फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची वर्णी लावल्याने निष्ठावंत चांगलेच संतापले आहेत. दरेकर हे मुळचे शिवसेनेचे असून, नंतर मनसेतून ते भाजपत आले. असे असताना त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी देण्यास भाजपच्या बहुतांश नेत्यांचा विरोध होता.

हा विरोध डावलून फडणवीस यांनी दरेकर यांचीच नियुक्ती केली. यावर भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. खरे तर विरोधी पक्ष नेतेपदी भाजपतील ज्येष्ठ सदस्य सुजितसिंह ठाकूर यांची वर्णी लागावी, म्हणून पक्षात लॉबिंग केली होती. ठाकूर हे अमित शहा यांचे निकटचे मानले जातात. असे असूनही त्यांना दूर ठेवून दरेकर यांची लागलेली वर्णी ठाकूर गटाला मानवलेली नाही. या गटाने आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद ठाकूर यांना मिळावे, यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पक्षात कुठलंही स्थान देऊ नये, असाही आग्रह या गटाने धरला आहे. या दोघांना पद दिल्यास आपल्याला त्याचा फटका बसेल, असे या गटाला वाटते.

First Published on: December 24, 2019 6:18 AM
Exit mobile version