‘अब्दुल सत्तार हिंदू असतील तर…’; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

‘अब्दुल सत्तार हिंदू असतील तर…’; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

अब्दुल सत्तार हिंदू असतील तर त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायला हवे होते. जर ते मुस्लीम असतील आणि मुस्लीम धर्माचे ते पालन करत असतील तर आम्ही त्यांना इस्लामच्या भाषेत समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृषीमंत्री तथा शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, जिकडे हवा, तिकडे थवा, अशी सत्तार यांची स्थिती आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. (Sushama Andhare Criticizes Abdul Sattar On Hindutva)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. सध्या उस्मानाबादमध्ये त्यांची महाप्रबोधन यात्रे सुरू असून, या यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करत असताना सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. “शिंदे गटातील सर्व आमादारांनी हिंदुत्वासाठी बंड केले असेल तर मग कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कशासाठी बंड केले होते. बंडानंतर सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र त्यावेळी सत्तार गेले नव्हते. अब्दुल सत्तार हिंदू असतील तर त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायला हवे होते. पण जर ते मुस्लीम असतील आणि मुस्लीम धर्माचे ते पालन करत असतील तर आम्ही त्यांना इस्लामच्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

“अफवांचं राजकारण करण्यात आले. मी सिल्लोडला जाऊन कुराणची आयत सांगितली. मी अब्दुल सत्तार यांनी भगवतगीतेचे श्लोक सांगितले तर त्यांना ते समजणार नाही असे मला वाटले. म्हणूनच मी सिल्लोडमध्ये जाऊन कुराणची आयत सांगितली. ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला. इस्लाममध्ये इमानला खूप किंमत असते, असे मी सांगण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांचे इमान कोणाशी आहे. त्यांची इमानदारी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशा कोणाशीच नाही. त्यांचे काम जिथे हवा तिथे थवा असे आहे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी आंदोलन केले. याच आक्षेपार्ह विधानामुळे सत्तार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिले आहेत.


हेही वाचा – ‘महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय’, संजय राऊतांचे विधान

First Published on: December 6, 2022 12:55 PM
Exit mobile version