सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मालिका आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या मालिका व सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) याने रविवारी सकाळी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली नाही, त्यामुळे सुशांतने इतक्या टोकाची भूमिका का घेतली याचा उलगडा होऊ शकला नाही. दुपारनंतर सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून घरातील तीन नोकरांसह त्याच्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्येमागील कारणाचा उलगडा होईल असे बोलले जाते. दरम्यान, त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे. सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी रात्री उशिरा ते सकाळी दहाच्या सुमारास वांद्रे येथील जॉकर्स पार्क, माऊंट ब्लॅन्क अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर सुशांतच्या मालकीचा तीन बेडरूमचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. त्याच्याकडे निरज सिंग, केशव बच्चेर हे दोघेही गेल्या एक ते दीड वर्षांपासून कूक म्हणून कामाला आहेत, तर दिपेश सावंत हा हाऊसकिपिंग तसेच दैनंदिन इतर कामे करीत होता.

शनिवारी सुशांतच्या घरी त्याचा मित्र आणि आर्ट डिझायनर सिद्धार्थ रामनाथमूर्ती पिठानी हा आला होता. यावेळी त्यांनी घरातच पार्टी केली होती. रात्री उशिरा सुशांत हा त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला, सकाळी त्याचा नोकर त्याला उठविण्यासाठी गेला. मात्र, दार ठोठावूनही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नोकराने सिद्धार्थला ही माहिती दिली. त्यानेही दरवाजा ठोठावला, सुशांतला हाक मारूनही तो दरवाजा उघडत नव्हता, हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना सुशांतने रूममध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ग्रीन कलरच्या बेडशीटने पंख्याला गळफास लावून सुशांतने आत्महत्या केल्याचे दिसून येताच सिद्धार्थने 108 क्रमांकासह पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा केल्यांनतर सुशांतचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. त्याचे त्याच्या प्रेयसीसोबत वाद सुरू होते, त्यातून तो मानसिक तणावात होता.

मात्र, याच कारणावरून त्याने आत्महत्या केली का, त्याच्या आत्महत्येमागे अन्य काही कारण आहे का, याचाही आता पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांना काहीही संशयास्पद मिळून आले नाही असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले. या आत्महत्येनंतर घटनास्थळी उपस्थित असलेले तीन नोकर निरज सिंग, केशव बच्चेर, दिपक सावंत आणि मित्र सिद्धार्थ पिठानी या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या चौघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने बॉलीवूडमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. सुशांतचे इंस्टाग्रामवर एक अकाऊंट असून त्यात त्याने 3 जूनला एक पोस्ट अपलोड केली होती. ही पोस्ट त्याने त्याच्या आईच्या नावाने दिली आहे. अंधूक भूतकाळ डोळ्याच्या अश्रूमधून गायब होत आहे, अपूर्ण स्वप्न अजून आनंद आणत आहेत आणि लवकरच संपणार.

आयुष्य दोघांमध्ये वाटाघाटी करीत आहेत असे नमूद करून त्याने शेवटी माँ असे लिहिले आहे. या पोस्टवरून सुशांत हा त्याच्या आईला प्रचंड मिस करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले होते. पाच दिवसांपूर्वी सुशांतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सतीश सालियन हिने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता सुशांतने आत्महत्या केली, या दोन्ही आत्महत्या एकमेकांशी संबंधित आहेत का याचाही पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, दिशाच्या आत्महत्येमागे सुशांतचा काहीही संबंध नाही. दिशा ही मानसिक तणावात होती, याच मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. दरम्यान, दिशाच्या आत्महत्येशी सुशांत सिंग राजपूतचा काहीही संबंध नव्हता, ती त्याच्याकडे पूर्वी कामाला होती, त्यामुळे सुशांतला या प्रकरणात चौकशीसाठी बोलाविण्यात आले नव्हते किंवा त्याची साधी चौकशीही झाली नाही असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

डिप्रेशनमध्ये होता सुशांत
सुशांत हा मागील सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांची ट्रिटमेंट सुरू होती. त्यातच त्याची मॅनेजर असलेल्या तरुणीने एक आठवड्यापूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतचे नैराश्य अजून वाढले होते. सुशांतने शनिवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी मित्रांसोबत पार्टी केली. पहाटे तो झोपायला आपल्या खोलीत गेला तो पुन्हा बाहेर आलाच नाही.

सुशांत सिंग राजपूत … एक प्रतिभावान तरूण अभिनेत्याला खूप लवकर मृत्युला सामोरे जावे लागले. त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजनाच्या जगात त्यांच्या उदयाने अनेकांना प्रेरणा मिळाली . त्यांच्या कित्येक संस्मरणीय भूमिका कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने धक्का बसला. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

First Published on: June 15, 2020 7:00 AM
Exit mobile version