‘…तिने काय-काय लफडी’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी ठोकला 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

‘…तिने काय-काय लफडी’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी ठोकला 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

मागील अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून आरोपप्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका करत असताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्यामुळे संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुषमा अंधारे यांनी आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

“ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत”, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्या विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला असून संजय शिरसाट यांना हे वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (sushma andhare file defamation case of 3 rupees against mla sanjay shirsat)

याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी पुण्यातील न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी “ही लढाई कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही तर केवळ महिलांच्या सन्मानासाठी आहे. महिलांबद्दल अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला चाप बसावा यासाठी ही लढाई आहे. महाराष्ट्रातील लेकी-बाळींबद्दल, महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य आणि अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हा एकच यामागे उद्देश आहे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

याशिवाय, “मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. त्याचबरोबर अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. लाखो कोटी रुपयांमध्येही करता येत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात नको. मी भटक्या विमुक्तमधून येते. आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान करणे हा सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून गुन्हेगाराला 3 रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.


हेही वाचा – Mumbai : पैसे घेतले पण फ्लॅट नाही दिले; निर्मल लाइफस्टाइलच्या 2 बिल्डरना अटक

First Published on: April 27, 2023 8:30 PM
Exit mobile version