ताडोबा अभयारण्यात वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण करताना माया वाघिणीने केलेल्या हल्ल्यात स्वाती ढुमणे (३८) या महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ किमी वर घडली. ही घटना घडली त्यावेळी अनेक पर्यंटक या ठिकाणी सफर करत होते.

सध्या ताडोबा जंगलातील अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना सुरू आहे. त्यासाठी स्वाती या तीन वनमजुरांसह वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्रान्झिट लाईन सर्वेक्षण ) करत होत्या. त्याचवेळी त्यांना २०० मीटर अंतरावर  माया वाघीण दिसली. वाघिण समोर असल्याचे बघून स्वाती आणि त्यांच्या टीमने रस्ता बदलला. पण काही क्षणातच वाघिणीने स्वाती यांच्यावर झेप घेत त्यांना फरफटत जंगलात नेले. काही कळण्याच्या आतच ही भयंकर घटना घडल्याने वनमजुरांसह तेथे असलेले पर्यंटकांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर या घटनेची माहिती कळताच वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जंगलात स्वातीचा मृतदेह आढळला.

या घटनेनंतर वनरक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून व्याघ्र प्रकल्पाची पाहणी आणि ट्रान्झिट लाईन सर्वेक्षण करताना वनरक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना पायी जावे लागते. यामुळे बऱ्याचवेळा वन्यप्राण्यांचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागतो. अशावेळी गाडी मिळाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी मागणी वनकर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

First Published on: November 21, 2021 11:12 AM
Exit mobile version