कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा; उर्जामंत्र्यांचे निर्देश

कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा; उर्जामंत्र्यांचे निर्देश

पावसाळ्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी महाजनकोला दिले. केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी करून नियमित आणि योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महाजनकोला विकत असल्याने ते माफक दराने देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी जोशी यांना केली. गेल्या तीन महिन्यापासून केंद्र सरकारकडून महानिर्मितीसाठी अपेक्षित साठ्याच्या ५० टक्केच कोळसा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या उपलब्धतेचा डॉ. राऊत यांनी आज आढावा घेतला. यावेळेस महानिर्मितीकडे उपलब्ध कोळसा आणि तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांची माहिती एका सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

सर्वसाधारणपणे ऐन पावसाळ्यात कोळशाची टंचाई वाढत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचेही निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. विजेच्या मागणीत सतत वाढ होत असल्याने आणि कोळश्याअभावी वीज निर्मितीत घट झाल्याने महावितरणला खुल्या बाजारातून कमाल मागणीच्या वेळी महागड्या दराने वीज खरेदी करावी लावत असल्याने उर्जामंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

भविष्यात कोळसा टंचाई होऊ नये यासाठी कोळसा मंत्रालययासोबत सतत पाठपुरावा करून अधिकचा कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीज टंचाईच्या काळात महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत असल्याने कोळसा खरेदीसाठी महावितरणने अधिकची तरतूद करून ती रक्कम महाजनकोला दिल्याने महाजनकोला कोळसा खरेदी करणे सोपे जाईल, अशी सूचना डॉ राऊत यांनी केली. यासाठी वेकोलि, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय,केंद्रीय कोळसा मंत्रालय यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा

First Published on: September 21, 2021 8:52 PM
Exit mobile version