दोन पावले माघारी या; भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन

दोन पावले माघारी या; भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन

‘भाजपचा गेल्या २५ वर्षाचा इतिहास बघितला तर ‘शिवसेना संपवणे’ हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, याठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील. तेव्हा दोन पावले माघारी या, असे आवाहन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना केले. तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, असेही जाधव म्हणाले. (Take two steps back Bhaskar Jadhav appeal to Eknath Shinde)

शिंदे सरकारवरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपला टोले लगावतानाच बंडखोर आमदारांना साद घातली. एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा मी आनंद व्यक्त करतो. पण तुमच्याबद्दल भाजपला काहीही प्रेम आलेले नाही. याची अनेक उदाहरणे मी सांगू शकतो. एकनाथरावजी हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. एका बाजूला तुमच्याकडे ४० शिलेदार उभे आहेत, दुसर्‍या बाजूला सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेला वाचावायला छातीचा कोट करून उभा आहे. तेव्हा कोण कोणाला धारातिर्थी पाडणार याचा विचार करा. खरा योद्धा तो असतो त्याला कुठे थांबायचे हे कळते, असे जाधव म्हणाले.

दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे

‘पानिपतच्या लढाईत जे झाले ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. महाराष्ट्रात महभारताची, रामायणाची पुनरावृत्ती होतेय. सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे राहून लढतील. काय सांगता तुम्ही सत्ता मिळविण्यासाठी हे केले नाही. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कोरोनासारख्या संकटात सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हा भेदभाव करायचा नसतो, पण तुम्ही कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, तर कुणाच्या हातात भोंगा दिला. पण सत्ता उलटली नाही’, असेही भास्कर जाधव यांनी भाजपला सुनावले.

‘एकनाथ शिंदे, तुम्ही ज्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करता. त्या भाजपने शिवसेनेच्या संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी काय काय केले? आता संजय राठोडचे ते काय करणार आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर ईडीची चौकशी लावली. पण नियती कोणालाही सोडत नाही. ज्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी टाकल्या आज त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन त्यांना वाचवावे लागतेय, ही वेळ भाजपवर आली’, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते ? तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. या सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावत आहात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेतले आहेत. प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, पडळकर, सुजय विखे, प्रसाद लाड, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंदडे, वैभव पिचड, कालिदास कोळंकबर… किती जणांना धुवून घेणार?’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा – हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

First Published on: July 4, 2022 9:41 PM
Exit mobile version