बिल थकल्याने तलाठी कार्यालय अंधारात

बिल थकल्याने तलाठी कार्यालय अंधारात

पोलादपूर येथील तलाठी कार्यालयातील वीज पुरवठा 15 दिवसांपासून खंडित केला गेलेला आहे. मार्च 19 पासून 4 हजार 130 रुपये थकबाकी न भरल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी तलाठी कार्यालयाचे बिल तहसील कार्यालयाकडून भरले जात असे. त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी एकत्रितपणे हे बिल भरतात. पण वेळेत बिल भरण्याचे भान कार्यालयाला राहिलेले नाही. या संदर्भात थकित बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून वारंवार करण्यात आले. मात्र तरीही तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याने लक्ष न दिल्याने वीज खंडित होण्याची नामुष्की कार्यालयावर ओढावली आहे. कार्यालयात पुरेसा उजेड नसणे आणि उष्णता जाणवत असल्याने कार्यालयाचा कारभार बाहेरच्या मोकळ्या हवेत बसून हाकला जात आहे.

दरम्यान, एखाद्या महिन्याचे बिल वेळेत भरले नाही म्हणून सर्वसामान्य ग्राहकांवर वीज पुरवठा खंडित करण्याचा बडगा उचलणारी महावितरण तलाठी कार्यालयावर काही महिने मेहरबान का झाली होती, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तलाठी कार्यालयाच्या थकित वीज बिलाबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र बिल न भरल्याने नियमाप्रमाणे सदर वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.
-सुनील सूद, उप कार्यकारी अभियंता

बिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल.
-दीप्ती देसाई, तहसीलदार

First Published on: November 15, 2019 1:50 AM
Exit mobile version