उद्या राज्यातील शाळा बंद राहणार ; राज्यभरातील शिक्षकांचे आंदोलन

उद्या राज्यातील शाळा बंद राहणार ; राज्यभरातील शिक्षकांचे आंदोलन

राज्यातील शाळा बंद राहणार

शिक्षक-शिक्षकेत्तर तसेच शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे. यानंतरही सरकारने शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक शिक्षक संघटनांनी दिली आहे.

बुधवारपासून बेमुदत संपाचा इशारा

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतनतूटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरावीत अशा ११ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीने ५ सप्टेंबरपासून काळ्याफिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. या कालावधीत सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ९ सप्टेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे. यामुळे राज्यभरातील शाळा बंद राहणार आहेत.

समन्वय समितीमध्ये फूट

महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीमार्फत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. परंतु काही शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन गणेशोत्सवानंतर करण्याची सूचना केल्यानंतरही समितीने ९ तारखेला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या मुद्यावरून संघटनांमध्ये फूट पडली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. संघटनेत फूट पडल्याने शाळा बंद आंदोलन पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्‍यता कमी असल्याचेही एका संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले आहे.


हेही वाचा – ‘मांडवी’एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने चाकरमानी संतप्त; रेल्वेचे नुकसान


 

First Published on: September 8, 2019 8:00 PM
Exit mobile version