नगराध्यक्षाच्या पुढाकारामुळे महावितरणचा मार्ग सुकर

नगराध्यक्षाच्या पुढाकारामुळे महावितरणचा मार्ग सुकर

कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या पुढाकारासह पाठपुराव्याने नगर परिषद हद्दीतील महावितरण कंपनीचे कमी दाबाच्या, तसेच उच्च दाबाच्या वाहिनीचे खांब, ट्रान्सफॉर्मर हलविण्यास नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील महावितरणाची कामे मार्गी लागणार आहेत.

जुन्या छत्री केंद्रा जवळील ईद्रुस विला येथे असलेला महावीर पेठेचा धोकादायक 630 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर हलविण्याची स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. त्यासाठी जोशी नगरसेविका असताना त्यांनी महावितरण कार्यालयाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला होता. तसेच महिला मंडळ शाळेसमोरील ट्रान्सफॉर्मर हलविण्याची शालेय व्यवस्थापन आणि नागरिकांची मागणी होती. त्याचप्रमाणे रस्ता रूंदीकरणात बाधित झालेले खांब, ट्रान्सफॉर्मर हलविणेदेखील गरजेचे होते.

या सर्व बाबींचा विचार करून नगराध्यक्षा जोशी यांनी महावितरणच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि कर्जत उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करून या कामांना मंजुरी मिळविली आहे. नगर परिषदेमार्फत टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी माहिती स्वतः जोशी यांनी दिली. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

First Published on: January 26, 2020 1:28 AM
Exit mobile version