राज्यात पुन्हा थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट

राज्यात थंडी परतली

यंदाच्या थंडीने कहरच केला हो… असं म्हणायची वेळ लोकांवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून थंडीने कुडकुडलेल्या राज्यातील नागरीकांना मागील चार-पाच दिवसांत काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र काल, गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. तसेच आज आणि उद्या थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सागण्यात येत आहे. चोवीस तासांमध्ये ४.१ अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा घसरला आहे. शहरात किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस नोंदले असून पुढील तीन दिवसांमध्ये किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. राज्यात नीचांकी तापमान नगर येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

शहरात थंडीची ये-जा

एरव्ही मुंबईसारख्या शहरात इतर जिल्ह्यांप्रमाणे गारवा जाणवत नाही. मात्र यंदाच्या हिवाळ्यात मुंबईतही मोठ्या प्रमाणात थंडी जाणवली. सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्ग, महिला कर्मचारी, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांनी स्वेटर, स्कार्फ, मफलर परिधान केले होते. प्रामुख्याने लोकलने प्रवास करणाऱ्यांना गार वारा जास्त लागतो. त्यामुळे पुढील दोन दिवसही राज्यात थंडी अशीच कायम असल्यामुळे नागरीकांनी त्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव हवामानावर 

पुणे शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १४.६ अंश सेल्सिअस तापमान वाढले होते. त्यावेळी सरासरीपेक्षा ३.२ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली होती. अवघ्या चोवीस तासांमध्ये म्हणजे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ४.१ अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव होता. त्यामुळे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेला किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. पण या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी पडत आहे.

हेही वाचा –

Video: जीवघेण्या थंडीत जवानांचे ‘मार्शल आर्ट’ ट्रेनिंग

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

First Published on: February 8, 2019 9:45 AM
Exit mobile version