चिपी विमानतळाच्या निमित्ताने ठाकरे- राणे एकत्र येणार

चिपी विमानतळाच्या निमित्ताने ठाकरे- राणे एकत्र येणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रथमच एकत्र येणार आहेत. त्यामुळे विमानतळ उदघाटनाच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे यांना या निमंत्रण असेल का? या प्रश्नावर सामंत यांनी एमआयडीसी जो राजशिष्टाचार ठरवेल त्यानुसार आमंत्रणे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशांना देखील यावर्षी मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने ९९६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून १०० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची २० एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासाठी यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.


 

First Published on: September 20, 2021 8:57 PM
Exit mobile version