सामनाच्या जाहिरातीत ठाकरे-फडणवीस फीट

सामनाच्या जाहिरातीत ठाकरे-फडणवीस फीट

बॅनर

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात शनिवारी पहिल्याच पानावर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसाच्या जाहीरातीत मुख्यमंत्र्यांचा फोटो झळकल्याने शिवसैनिकांमध्ये शनिवारी चर्चा रंगली खरी, पण लोकसभेपाठोपाठच विधानसभेच्या निमित्ताने आता शिवसेनेकडून युतीचे संकेत उघड होऊ लागले आहेत. शिवसेनेतील प्रोटोकॉल मोडत पहिल्यांदाच भाजपने आपली युतीची जागा ही मुख्यमंत्र्यांच्या फोटोच्या निमित्ताने दाखवली आहे. लोकसभेप्रमाणे शिवसेनेला विधानसभेतही भाजपची मोठी गरज असल्याचे या जाहिरातीतून दिसून आले आहे.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या १८ मेच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा पटकावली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रांगेतच मुख्यमंत्र्यांना स्थान मिळाले आहे. मिलिंद नार्वेकर यांची भाजपची जवळीक यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली आहे. सामनाच्या जाहिरातीत शिवसेनेचे खासदार-सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दुसर्‍या रांगेत स्थान मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकांआधी जोपर्यंत युती झालेली नव्हती तोपर्यंत सामनाच्या माध्यमातून सातत्याने भाजपची कोंडी करण्यासाठी सामनाचा वापर करण्यात आला होता. पण आजच्या जाहिरातीच्या निमित्ताने विधानसभेसाठीही युतीचे संकेत मिळाले आहेत. मालाड विधानसभेचे शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी दिलेली जाहिरात ही सामनाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. पण शेजारत्या जाहिरातीत मात्र नेहमीच्या नेत्यांचे फोटो झळकले आहेत. येत्या दिवसांमध्ये अशा आणखी किती जाहिराती युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पहायला मिळतील हे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

First Published on: May 19, 2019 5:05 AM
Exit mobile version