‘आवाज काढणं खूप झालं, आता मॅच्युर व्हा…’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

‘आवाज काढणं खूप झालं, आता मॅच्युर व्हा…’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आवाज काढणं खूप झालं. आता मॅच्युर व्हा आणि संघटनात्मक काम करा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams MNS Chief Raj Thackeray)

मुंबईत प्रसार प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची ओरिजनल मिमिक्री पाहू. राजकारणात आता अजून किती दिवस आवाज काढत बसणार? आता तरी मॅच्युर व्हा आणि प्रगल्भ राजकारण करा. आवाज काढणं आता खूप झालं. याच्या पलिकडे पाहायला हवं, संपूर्ण महाराष्ट्र पाहा”

शिवाय “उद्धव ठाकरेंवर टिका करुन तुमचं राजकारण किती दिवस चालणार? जरा विधायक आणि संघटनात्मक काम करा. आता आमच्यावर इतकी संकटं आलेली आहेत तरी आम्ही लढतो आहोत. काम करतो आहेत. जे टिका करताहेत त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी” अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपावरही निशाणा साधला.”छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. आमच्या आराध्य दैवतांचा भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून अपमान होतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते हे अपमान करत आहेत. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्या पद्धतीने आम्ही हा विषय बाजूला करू असे त्यांना वाटत असेल. कर्नाटकाकडून महाराष्ट्राचा होणार अपमान. आता विरोधीपक्ष एकत्र आलेला आहे. विरोधी पक्षाचा अॅक्शन प्लॅन रेडी आहे. पण सध्या आम्ही वाट पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ त्यांचे आमदार, जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले. हे अजून हात चोळत बसले आहेत”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे; वीज बिलाच्या मुद्द्यावर फडणवीसांचा टोला

First Published on: November 28, 2022 11:42 AM
Exit mobile version