ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा प्रमुखांना तडीपारची नोटीस

ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा प्रमुखांना तडीपारची नोटीस

कल्याण । कल्याण मुरबाडचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले विजय उर्फ बंड्या साळवींना तडीपार का करू नये असे विचारणा करणारी नोटीस आली आहे. गेल्या आठवड्यात उल्हासनगरचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या समर्थकासहित प्रवेश केल्याने शिवसेनेला कल्याणात मोठा हादरा देण्याचे काम केल्याचे सांगण्यात येत आहेत.

गेल्या काही महिन्यापासून कल्याण विभागात ठाकरे गटाच्या प्रसारासाठी विजय उर्फ बंड्या साळवी यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते संघटनेचे काम करताना दिसत आहेत. गणेशोत्सवात साळवी यांनी देखाव्याचे चलचित्र दाखवीत बंडखोरांना चपराक लगावली होती. देखावा वादग्रस्त असल्याने पोलिसांनी पहाटेच्या सुमारास देखाव्यावर बंदी घालून देखाव्याचे साहित्य जप्तही केले होते.

कल्याणाचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी तीन जिल्ह्यातून विजय साळवी यांना तडीपार का करू नये याबाबत नोटीस बजावली आहे. मुंबई , ठाणे, रायगड या जिल्ह्यातून तीन वर्षाकरता ही तडीपारची नोटीस देण्यात आली असल्याने ठाकरे गटातील शिवसेनेत अस्वस्थता आहे. १९९३ पासून ते आजपर्यंतच्या गुन्ह्यांची माहिती घेत साळवी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. साळवी यांच्या दखलपात्र गुन्ह्यांमुळे नजीकच्या काळात गुन्हेगारी कारवायांच्या आरोप आणि अपराधांच्या मागील घटनांचा उल्लेख पोलिसांनी केला आहे. तसेच बचावासाठी साळवी यांचे म्हणणे प्रत्यक्षात उपस्थित राहून मांडावे यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत साळवी यांनी तडीपारची नोटीस घेतली असून दहा ते पंधरा दिवसात आपण याबाबत जबाब देणार असल्याचे त्यांनी डी सी पी गुंजाळ यांना कळविण्यात आल्याचे म्हटले आहे.

First Published on: December 25, 2022 9:05 PM
Exit mobile version