ठाकरे गटाचे अजून १० आमदार फुटणार; शिंदे गटाचा दावा

ठाकरे गटाचे अजून १० आमदार फुटणार; शिंदे गटाचा दावा

मुंबईः ठाकरे गटाचे दोन खासदार व दहा आमदार फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी शनिवारी केला. त्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाचा अजून कोणता खासदार व आमदार फुटणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले, निवडणूक आयोगाने योग्य निकाल दिला आहे. हा निकाल अपेक्षितच होता. आता एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आम्ही करणार आहोत. निवडणूक आयोगाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील निकालही आमच्या बाजूने लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यवाण कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गहाण ठेवला होता. तो आम्ही सोडवला, असा दावाही कृपाले यांनी केला.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे या नावावर निवडून आलेले खासदार, आमदार आमचेच झाले आहेत. दसरा मेळाव्यातच दोन खासदार आमच्यासोबत येणार होते. ते दोन खासदार व दहा आमदार लवकरच आमच्यासोबत येतील, असेही कृपाल यांनी सांगितले.

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर दावा करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. या दाव्याला ठाकरे गटाने विरोध केला. सुमारे चार महिने यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. ठाकरे व शिंदे गटाने आपला दावा सिद्ध करण्यासाठी कागदपत्रेही आयोगासमोर सादर केली. आयोगाने उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर यावरील निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले जात असल्याचा निकाल दिला. त्यानंतर शिंदे गटाने राज्यभरात एकच जल्लोष केला. ठाकरे गटाने या निकालावर टीका केली. नाव व चिन्ह शिंदे गटाने चोरले. ही चोरी पचणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या निकालावर निशाणा साधला. हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असाही आरोप करण्यात आला. त्यातच ठाकरे गटाचे अजून दोन खासदार व दहा आमदार फुटणार या कृपाले यांनी केलेल्या दाव्यामुळे नवीनच चर्चांना उधाण आले आहे.

First Published on: February 18, 2023 8:05 PM
Exit mobile version