ठाण्यात ‘मी रिक्षाचालक’, ‘मी मुख्यमंत्री’चे टी शर्ट परिधान करत रिक्षाचालक रस्त्यावर

ठाण्यात ‘मी रिक्षाचालक’, ‘मी मुख्यमंत्री’चे टी शर्ट परिधान करत रिक्षाचालक रस्त्यावर

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रिक्षावाला, टपरीवाला अशाप्रकारे शिंदे यांना पाठींबा देणाऱ्या आमदारावर टीका झाली होती. त्या टिकेला मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर ही दिले आहे. ठाण्यात शिंदे यांच्या समर्थनार्थ रिक्षाचालक एकवटले असून त्यांनी ‘मी रिक्षाचालक’, ‘मी मुख्यमंत्री’ असे टीशर्ट परिधान करत ठाणे महापालिका मुख्यालयावर गर्दी केली. हे रिक्षाचालक रॅलीकाडून शिंदे यांना समर्थन जाहीर करणार आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांची संख्या ही अधिक आहे. तर मुख्यालय परिसरतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या केल्या आहेत, त्यावर भगवे झेंडे लावले आहेत.

ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर बॅनर –

ठाण्यातील एका रिक्षावाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला याचा अभिमान असल्याचे दर्शवणारा एक बॅनर ठाण्यातील नौपाडा परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर रिक्षा चालक-मालकांकडून लावण्यात आला आहे. या बॅनरवर होय,आम्हाला अभिमान आहे.. आमचा रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांनी दिली रॅलीची माहिती –

आज (गुरुवारी) हे सर्व रिक्षाचालक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने रॅली काढणार आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालय प्रवेशद्वारापासून या रॅलीला सुरुवात होणार असून संपूर्ण शहरात ही रॅली जाणार असल्याची माहिती ठाण्याच्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी दिली होती.

First Published on: July 7, 2022 12:59 PM
Exit mobile version