शिवसेनेसोबतची आघाडी अनैसर्गिक – रामदास आठवले

शिवसेनेसोबतची आघाडी अनैसर्गिक – रामदास आठवले

निवडणूक निकालानंतर सत्तास्थापन करण्याअगोदर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला होता. परंतु भाजपने त्यांचे ऐकले नाही हे पाहून शिवसेनेने त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी आपण प्रयत्न केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे आधी समोर आले असते तर भाजपने त्यांना पाठिंबा दिला असता, असे रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. शिवसेनेने केलेली आघाडी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. ही अनैसर्गिक आघाडी असून ती किती दिवस टिकेल याची कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न केव्हाच पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली शिवसेना राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याची अपेक्षा नव्हती. परंतु तो मिळाला आहे. आघाडीत मंत्रीपदावरून वाद होतील. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर जनतेची कामे करावी, असेही आठवले यावेळी म्हणाले. ही आघाडी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे टिकेल. मी भाजपसोबतच राहणार आहे; पण मित्रपक्षांबाबत कल्पना नाही, असे आठवले म्हणाले.

First Published on: November 22, 2019 2:31 AM
Exit mobile version