“राज ठाकरेंनी स्वतंत्र राहावे, भाषणे ठोकावीत”, रामदास आठवलेंचा सल्ला

“राज ठाकरेंनी स्वतंत्र राहावे, भाषणे ठोकावीत”, रामदास आठवलेंचा सल्ला

मुंबई | “राज ठाकरेंना सोबत घेणे भाजपला परवडणार नाही. यामुळे त्यांनी स्वतंत्र राहावे, आणि भाषणे ठोकावीत”, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. साताऱ्यातील विश्रामगृहात रामदास आठवले थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“राज ठाकरेंना भाषणे ठोकायला आवडतात. राज ठाकरे भाजपसोबत आले तर त्यांना एवढी भाषणाबाजी करायला मिळणार नाही. राज ठाकरेंची आम्हाला गरज नाही. कारण, त्यांना देशपातळीवर भाजपसोबत घेणे परवडणार नाही. मी भाजपसोबत असेपर्यंत राज ठाकरेंची गरज नाही”, असे आठवलेंनी माध्यमांना सांगितले.

अजित पवार भाजपसोबत आले तर…

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अजित पवार यांच्या यासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले, “अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणारे कार्यकर्ते उत्साही आहेत. मुख्यमंत्री व्हावे असे अनेकांना वाटते. परंतु, अजित पवारांची ती इच्छा पूर्ण होणार नाही. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात आले होते. तेव्हाही अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. परंतु, त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. आताही अजित पवारांना संधी मिळेल असे मला वाटत नाही. अजित पवार जर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच आहे. पण, अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळेल यांची शाश्वती नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहितील”, असेही आठवलेंनी यावेळी सांगितले

संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंवर ही वेळ 

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टांगती तलवार नाही. ती उद्धव ठाकरेंवर आहे. जर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले नसते तर, ही वेळ आली नसती. संजय राऊतांमुळे हे सर्व घडले असून उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची कामे केली नाहीत. तर शिवसेनेत बंडाळी झाली नसती. तसेच रिपब्लिकन पक्षाचे देशव्यापी अधिवेशन २८ मे रोजी शिर्डीत होणार आहे”, अशी माहिती आठवल्यांनी दिली.

First Published on: April 28, 2023 4:03 PM
Exit mobile version