कोल्हापूरचे ब्रह्मनाळ स्मार्ट व्हिलेज

कोल्हापूरचे ब्रह्मनाळ स्मार्ट व्हिलेज

पुराचा मोठा फटका बसलेल्या ब्रम्हनाळ गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्याचा महत्वकांशी प्रकल्प येत्या ८ महिन्यात राबविण्यात येणार आहे. एकूण २२५ कुटुंबांचे पूररेषेपासून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सांगली येथील ब्रम्हनाळ या गावाचे पुनर्वसन नागाव या ठिकाणी होणार आहे. तर कोल्हापूर येथील उमळवाडी गावाचे पुनर्वसन जैनापूर येथे करण्यात येणार आहे. ब्रहनाळवासीयांचे सध्याच्या ठिकाणाहून ५ किमी अंतरावर पुनर्वसन करण्यात येणार आहे. पूररेषेपासून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी १५ एकर जमीन राज्य सरकारने संपादित केली आहे.

खेड्यातही पुनर्वसनासाठी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना राबवली जाणार असल्याचे महा हाऊसिंगचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी सांगितले. रस्ते, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, सोलार ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच समारंभासाठी मोकळी जागा अशी व्यवस्था स्मार्ट व्हिलेजच्या संकल्पनेत राबविण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत याठिकाणी बांधकाम सुरू होऊन आठव्या महिन्यात पुराचा फटका बसलेल्या लोकांना निवारा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुन्हा पुररेषेतील जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठी त्याठिकाणी बांबुची लागवड करण्यात येईल असाही निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे जमीनीची धूप कमी होण्यासाठी मदत होईल.

मुंबई महापालिका, जिल्हा परिषद, क्रेडई तसेच खाजगी कंपन्यांनीही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून या गावांना मदत केली आहे. तसेच राज्य सरकार आणखी काही गावांची निवड स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी करणार आहे. सध्या भूसंपादन झालेल्या गावांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. काही यंत्रणांकडूनही गाव दत्तक घेण्यासाठी मदतीचा हात पुढे आला आहे. या संपूर्ण प्रकल्पात महाहाऊसिंग तांत्रिक सल्लागार म्हणून काम करेल, असे मिरगणे यांनी सांगितले.

First Published on: September 19, 2019 6:59 AM
Exit mobile version