शिंदे गटात सामील व्हा नाही तर…, पोलीस उपायुक्तांनी धमकी दिल्याचा नगरसेवकाचा आरोप

शिंदे गटात सामील व्हा नाही तर…, पोलीस उपायुक्तांनी धमकी दिल्याचा नगरसेवकाचा आरोप

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हा, नाहीतर तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला दिली आहे, असा आरोप ऐरोलीतील शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. मातोश्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या निष्ठावंतांना आपल्या गोटात खेचण्यासाठी ईडी सरकार थेट एन्काऊंटरच्या पातळीला गेल्याचा आरोप एम. के. मढवी यांच्याकडून करण्यात आला आहे. सत्ताधायांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून सुरू केलेल्या या दहशतवादाचा शिवसेनेने निषेध केला आहे.

वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एम. के. मढवी यांनी ईडी सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर मी आणि माझे कुटुंब मातोश्रीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची हालचाल नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. यासंदर्भात मी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी मला थेट शिंदे गटात सामील होण्यासाठी धमकावले. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील व्हा, जाताना विजय चौगुले यांच्या माध्यमातूनच जा, जास्त आडेवेडे घेऊ नका, नाहीतर तुम्हाला तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, असाही दम त्यांनी दिला. पोलिसांकडून होत असलेल्या या छळवणुकीमुळे मी आणि माझे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे, असेही एम. के. मढवी यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, ज्येष्ठ नगरसेविका विनया मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, मिलिंद सूर्यराव, संदीप पाटील, अतुल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, चेतन नाईक, प्रकाश चिकणे, विशाल विचारे, विजय चांदोरकर, उपजिल्हा संघटक आरती शिंदे, वसुदा सावंत, आशालता गोंधळी आदी उपस्थित होते.

मातोश्रीवर न जाण्यासाठी धमकावले

तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे या, माझ्याकडे आल्यानंतर तुमचे आणि तुमच्या कार्यकत्याचे भलेच होणार आहे. तुमच्या कुटूंबाला आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही मातोश्रीवर जाण्याचे थांबवा, असा दम मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून दिला होता, असाही आरोप एम. के. मढवी यांनी यावेळी केला.

…तर सामूहिक आत्महत्या करू

विवेक पानसरे यांनी फक्त मला एन्काऊंटरची धमकीच दिली नाही, दहा लाख रुपयांची खंडणीही मागितली. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आमचे काही बरेवाईट झाले तर त्याला विवेक पानसरे, माजी आमदार संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार असणार आहेत. ही छळवणूक याच पद्धतीने सुरू राहिली तर मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करू, असा इशाराही एम.के.मढवी यांनी यावेळी दिला.

कायदा-सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही

आपल्या गटात सामील न होणाऱ्या पदाधिका ऱ्यांची छळवणूक सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याही हॉटेलवर विनाकारण रेड टाकण्यात आली. ईडी सरकारच्या कार्यकाळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली.

एम के मढवी यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्यावर नुकताच दंगलीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यांना तडीपार होण्याची भीती वाटत असल्यामुळे त्यांनी हे खोटे आरोप केलेले आहे.

– विवेक पानसरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 नवी मुंबई

First Published on: October 1, 2022 8:29 PM
Exit mobile version