मृतदेहावर आकारला २० हजारांचा दंड, जात पंचायतीचे क्रौर्य

मृतदेहावर आकारला २० हजारांचा दंड, जात पंचायतीचे क्रौर्य

जळगावातील जाखनी नगर येथील कंजारभाट जातपंचायतीचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे यांचा मोठा मुलगा आनंद बागडे यांनी मानसीच्या आईशी 20 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना दोन मुली असून, त्यातील एक मानसी होती. त्यानंतर आनंद बागडे यांनी वडिलांच्या इच्छेनुसार जातीतील मुलीशी दुसरा विवाह केला. तिच्यापासूनही तीन मुले झाली.

आईला जातीत घेण्यासाठी मानसीने आजोबा दिनकर बागडे यांच्याकडे अनेकवेळा विनंती केली होती. त्यासाठी कंजारभाट समाजातील मुलाशी लग्न करण्याचीही तयारी तिने दर्शवली होती. जातीत घेऊन ’जातगंगा’ देण्याची याचना तिने केली होती. मात्र, दिनकर बागडे व जातपंचायत सदस्य सावन गागडे, दीपक माछरे, बिरुजू नेतले, मंगल गुमाने व संतोष गांरुगे आदींना मानसी आणि तिच्या आईला जातीत घेण्यास नकार दिला. तसेच, नातीसह सुनेचा छळ केला. तिचे काका विजय बागडे यांनी मानसीचे लग्न कोल्हापूर येथे तरुणाशी निश्चित केले. मात्र, आजोबा व जातपंचायतीच्या नकार घंटेमुळे मानसीने गुरुवारी (दि.23) सकाळी विजय बागडे यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे सोपस्कार पार पाडले. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येची सखोल चौकशी करावी, तिच्या मृत्यूस कारणीभूत जातपंचायतीच्या सदस्यांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा २०१६ नुसार कारवाई करावी, अशी मागणी जळगावच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

First Published on: January 24, 2020 8:04 PM
Exit mobile version