युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात

युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात

शिवसेना-भाजप युती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि सर्व राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली. एकीकडे महाआघाडीने आपला प्रचार सुरू केला असून, आता शिवसेना-भाजप युतीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. 24 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करणार आहेत.

मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे यांची उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि युतीच्या जागेबाबत चर्चादेखील केली. दरम्यान आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नसताना शिवसेना-भाजप मात्र एक पाऊल पुढे असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जालना आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांमधील संघर्ष कसा मिटवता येईल, यावर देखील या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.

मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
राज्यात ज्या युतीच्या सभा होणार आहेत, त्यात काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील. नेमक्या या सभा कुठे ठेवायच्या यावर देखील विचार करून नरेंद्र मोदी यांच्या वेळेनुसार या सभा ठरवल्या जाणार आहेत.

आदित्य यावर्षी निवडणूक रिंगणात नाही
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या तरी आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर निवडणूक लढवण्याबाबत कोणतेही बंधन घातले नव्हते, त्याचप्रमाणे मीदेखील आदित्यवर कोणतेही बंधन घातलेले नाही. भविष्यात आदित्यने निवडणूक लढवायची की नाही ते आदित्य आणि शिवसैनिक ठरवतील, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published on: March 14, 2019 4:21 AM
Exit mobile version