महाविकास आघाडीत सर्व ठरवून गेम चाललायं

महाविकास आघाडीत सर्व ठरवून गेम चाललायं

माजी मंत्री म्हणू नका दोन दिवसांत कळेल, चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. रोज सकाळी एक गेम तयार करायचा अन जनतेला वेडयात काढायचं हे सगळं ठरवून चाललेला प्लॅन आहे. परंतू राज्यातील जनता इतकी खुळी नाही. जनता आता निवडणुकांची वाट पाहते आहे असा सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सध्या अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत पटोले यांच्या भूमिकेविषयी नाराजी असल्याचे दिसून येते. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या भेटीगाठी नेत्यांचे दिल्ली दौरे यामुळे हे सरकार कोसळेल अशीही शक्यता वर्तवली जाते. या सर्व राजकिय घडामोंडीच्या पार्श्वभुमीवर आज नाशिकमध्ये बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं आणि एकाने समजवल्यासारखं करायचं असं अगदी ठरवून गेम चालले आहे. हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. जनता आता निवडणुकांची वाट बघते आहे. २०२२ मध्ये तीनचर्तुथांश महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत. १५ महापालिका, १८२ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद. पंढरपूरच निवडणुकीत आम्हाला दाखवतो असे म्हटले होते. तसं २०२२ ला दाखवु असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात तीन पक्ष सत्तेत आहेत रोज सकाळी गेम तयार करायचा. एक जणाने दिवसभर तोच विषय सुरू ठेवण्यासाठी बोलायचंंं, हे सगळं ठरवून चाललं आहे असे सांगत त्यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला.

ठाकरेंसोबत चहा घेईन
नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांना भेटणार का याबाबत बोलतांना ते म्हणाले, नाशिकमध्येच मी त्यांना भेटलो पाहिजे असे काही नाही मी त्यांच्या घरीही जाउ शकतो इतके आमचे चांगले संबध आहेत. पण, इथे त्यांच्या माझ्या वेळा जुळल्या तर इथेही मी त्यांच्यासोबत चहा घेईन. भाजप मनसे एकत्रित येण्याबाबत ते म्हणाले की, आमची कोअर कमिटी असते या कमिटीतील सदस्यांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर कोणताही निर्णय घेतला जातो. परंतु असे काही ठरले नाही. आणि परस्पर काही करण्यासाठी मी प्रसिध्द नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली याबाबत ते म्हणाले की, नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. नविन मंत्र्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत. त्यांची ही भेट रूटीन आहे. मी पण ऑगस्टमध्ये जाणार आहे. फडणवीस शहा यांची आता लगेच सहकार विषयात चर्चा झाली असेल असे नाही. राज्यातले काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी ते गेले आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली भेटीकडे वेगळया अर्थाने बघण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 17, 2021 11:24 AM
Exit mobile version