लोखंडी शिडी कोसळली

लोखंडी शिडी कोसळली

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे जाण्यासाठी ट्रेकिंग करीत जाणारे ट्रेकर्स कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील महत्त्वाची आणि ट्रेकर्सना आवडणारी पायवाट म्हणजे शिडी घाट. मुसळधार पाऊस आणि वार्‍यामुळे येथे बसवण्यात आलेली लोखंडी शिडी कोसळली आहे. त्यामुळे आव्हानात्मक असलेला हा शिडी घाट यावर्षी बंद झाला आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शिडी घाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

भीमाशंकरला खांडस मार्गे जाणार्‍या भाविकांची रिघ लागत असते. सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरीता रेल्वेने नेरळ किंवा कर्जत स्टेशन आणि तेथून कशेळे येथे आल्यानंतर दर पंधरा मिनिटांनी खांडसकडे जाणार्‍या मिनिडोअरने 14 किलोमीटर अंतरावरील काठेवाडी (खांडस) येथून जाण्याकरिता दोन मार्ग आहेत. थोडासा अवघड असणार्‍या शिडी घाट मार्गे भीमाशंकरला पोहचता येते. तेथे अनेक वर्षांपासून असलेली लाकडी शिडी बदलून लोखंडी शिडी लावल्याने धोकादायक मार्ग थोडा सोपा झाला होता. मात्र यावर्षी सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍याने शिडी कोसळून गेली आहे. 25 फूट उभे कातळ चढून जावे लागणारा शिडी घाट हा भीमाशंकर अभयारण्य फिरण्यासाठी येणार्‍या ट्रेकर्सचा आवडीचा मार्ग आहे.

खांडस येथे फलक लावून शिडी घाट बंद असल्याची माहिती दिली जाणार आहे. त्याचवेळी फलकांवर शिडी घाटातील मोडलेल्या लोखंडी शिडीचे फोटो मोठ्या आकारात छापले आहेत. ते फलक महत्त्वाच्या रस्त्यावर देखील लावले जाणार आहेत.
-वैशाली परदेशी, प्रांत, कर्जत

First Published on: August 1, 2019 4:46 AM
Exit mobile version