धुळीत हरवलेत महामार्ग

धुळीत हरवलेत महामार्ग

पावसाचे प्रमाण कमी होताच ऊन पडल्यानंतर सुकणार्‍या रस्त्यांवरून प्रचंड धूळ तयार होत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना कमालीचा त्रास होत आहे. मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, तसेच खोपोली-वाकण महामार्ग तर अनेकदा धुळीत हरवत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वैतागलेल्या प्रवाशांना आता धुळीचाही त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवास नकोसा झाला आहे.

गेले चार महिने खालापूर तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरलेला मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अद्यापही दुरुस्तीची वाट पहात आहे. आठवडाभर पावसाच्या विश्रांतीनंतरही ठेकेदार रस्त्याकडे फिरकला नाही. खालापूर-खोपोली या 7 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण कामाला सुरूवात होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. ठेकेदाराने अगोदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पावसाळा आला की प्रवाशांच्या मरण यातना सुरू होत आहेत. हे कमी काय म्हणून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या चिखलमिश्रित खडीनंतर कडक उन्हामुळे धूळ निर्माण झाली आहे. धुक्यातून वाट काढावी तशी धुरळ्यातून मार्ग काढावा लागत आहे. आधीच खड्ड्यांतून प्रवास करताना कंबरदुखी, मानदुखीसह विविध आजारांचा सामना करावा लागत असताना चालक व प्रवाशांना आता धुळीमुळे श्वसनाचे आजार जडण्याची भीती आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे खालापूर-खोपोली रस्ता सध्या नसला तरी या मार्गाची टोलवसुली सुरूच असल्याने ती बंद करण्याची मागणी रस्ता सुरक्षा अभियानचे सदस्य विकी भालेराव यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी एस. सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरुन प्रवास करणे खडतर झाले होते. आता धुळीचेही साम्राज्य पसरल्याने या मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे. वाहतूक कोंडी, खड्डे, अपघात अशी ओळख असलेल्या या महामार्गाची धुळीचा मार्ग म्हणूनही नवी ओळख झाली आहे. होडीत बसून प्रवास केल्याचा अनुभव घेणारे प्रवासी धुळीचे लोटही अंगावर घेत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली माती, ग्रीट यातून तयार होणारी धूळ लांबून धुक्याच्या दुलईसारखी दिसत असते. दिवसाप्रमाणे रात्रीही या मार्गावरून वाहन चालविणे जिकरीचे झाले असल्याचे चालक सांगतात.

First Published on: September 26, 2019 1:27 AM
Exit mobile version