‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश

‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश

'मोहन टू महात्मा' कार्यक्रमा दरम्यानचा फोटो

संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिसेंचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोहन टू महात्मा या वेगळ्या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनातून अभिवादन केले. एवढेच नव्हे तर बालपण ते स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान असा समग्र जीवनपटच विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गायन अशा कलाविष्काराच्या माध्यमातून उलगडला. महात्मा गांधींची हा प्रेरणादायी जीवनप्रवास बघताना उपस्थित सर्वांनाच नवी दिशा व विचार देऊन गेला. भाभानगर परिसरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात इस्पॅलियर स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

स्नेहसंमेलन म्हटले की, धांगडधिंगा. या पारंपारिक पद्धतीला फाटा देत इस्पॅलियर स्कूलतर्फे मोहन टू महात्मा या विषयावर आधारित अनोखे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उदघाटनही अभिनव पद्धतीने करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन न करता महात्मा गांधींच्या अंबर चरखा सूत कताई करत या स्नेहसंमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. ७ तास, ८०० विद्यार्थी अन् ७६ कलाप्रकार – मोहन टू महात्मा या विषयावरील स्नेहसंमेलनात इस्पॅलियर स्कूलमधील ८०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत कलाविष्कार सादर केला. सलग सात तास या विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गायन अशा वेगवेगळ्या पद्धतीने ७६ कलाप्रकार सादर करत महात्मा गांधींचा जीवनपट उलगडून दाखविला.

अभिनव पद्धतीने ‘स्वच्छ भारत’चा संदेश – स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, सत्यागृह, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी कचरा साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे झाडू, खराटा, केरसुणी, डस्टबिन, गवत कापणी यंत्र यांचा सर्मपक पद्धतीने संगीत वाद्य म्हणून वापर करत विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत गीत सादर केले. तसेच स्वच्छ भारत व स्वस्थ भारत हा प्रबोधनात्मक संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.

First Published on: December 11, 2018 9:20 PM
Exit mobile version