‘ऑपरेशन हॉस्पिटल ‘ चळवळ अधिक तीव्र करणार

‘ऑपरेशन हॉस्पिटल ‘ चळवळ अधिक तीव्र करणार

रूग्णांचे डिपॉझिटचे पैसे न देणार्‍या वोक्हार्ट हॉस्पिटल विरोधात कपडे काढून आंदोलन करावे लागले. परंतू तरीही रूग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने रूग्णांचे पैसे परत केलेले नाही. परंतु ‘ऑपरेशन हॉस्पिटलची’ ही चळवळ अधिक तीव्र करण्यात येणार असून रूग्णांची लुटमार करणार्‍या रूग्णालयांची पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा आम आदमीचे सचिव धनंजय शिंदे यांनी दिला. सर्वसामान्यांना न्याय कुठे मागावा असा प्रश्न असून खासगी रूग्णालय, शासन प्रशासन यांच्या अभद्र युतीमुळे जनतेला कोणी वालीच राहीला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिंदे म्हणाले, नाशिकमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात चोर सोडून संन्याशाला फाशी या न्यायाने वागत जितेंद्र भावे यांना बेकायदेशीररित्या अटक केली. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतांना एखाद्या सराईत गुंडासारखी वागणूक दिली गेली याचा आम्ही निषेध करतो. या संकट काळात सराकारने जनतेच्या बाजूने उभे राहावे आणि दोषी कॉर्पोरेट रूग्णालयांवर कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले. ऑपरेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकमध्ये औषध विक्रीचा काळाबाजार, अवास्तव मेडीकल बिल अशा अनेक विषयांवर रूग्णालयांचा पर्दाफाश करत रूग्णांचे पाच करोड रूपये परत मिळवून दिले. यापुढेही ही मोहिम सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करत आरोग्य क्षेत्रातील बाजारीकरणाविरोधात अधिक ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य
महाराष्ट्र सरकार आरोग्याला प्राथमिकता देत नाही. दिल्लीतील केजरीवाल सरकार आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या १३ टक्के रक्कम खर्च करते. तर महाराष्ट्र सरकार अवघे ३ टक्के रक्कम खर्च करते. मेडिकल कॉलेज सम्राट सत्तेत बसले आहेत. त्यामुळे यापुढे या चळवळीच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तर पुन्हा आंदोलन..
वोक्हार्ट रूग्णालयाने तरूणाला डिपॉझिटचे पैसे देतो म्हणून कबुल केले परंतु अद्यापपर्यंत पैसे परत देण्यात आलेले नाही आम्ही काही काळ वाट बघू अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल.
जितेंद्र भावे, प्रवक्ता आम आदमी पार्टी

या आहेत मागण्या
वोक्हार्ट हॉस्पिटलने रूग्णांना दिलेल्या मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई द्यावी.
वोक्हार्ट हॉस्पिटलची मान्यता रदद करण्यात यावी.
सर्व खासजगी हॉस्पिटलचे ऑडीट करावे व लुटलेले पैसे दंडासह परत करावे

First Published on: May 26, 2021 8:35 PM
Exit mobile version