Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर; ज्येष्ठ विधिज्ञांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर; ज्येष्ठ विधिज्ञांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

Maharashtra Political Crisis : मुंबई – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. संविधान पीठातील एका न्यायाधिश १५ मेपर्यंत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मे रोजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संविधानतज्ज्ञ उल्हास बापट यांनी १० मेनंतर निकाल येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर विधिज्ञ असिम सरोदे यांनी ११ किंवा १२ मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता सांगितली आहे. अॅड. सरोदे यांनी निकालाच्या काही शक्यताही व्यक्त केल्या आहेत.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार महाराष्ट्रातील घटना ही सर्वात क्लिष्ट आणि गुंतागुंतीची झाली आहे. या निकालाचा परिणाम हा फक्त महाराष्ट्रापुरता न राहाता दूरगामी परिणाम करणारा राहाणार आहे. यामुळे या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

निकालाच्या चार शक्यता 

अॅड. असिम सरोदे यांनी प्रमुख चार शक्यता व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार, पहिली शक्यता आहे की शिवसेनेत बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाऊ शकतो.
दुसरी शक्यता आहे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा घेतलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केला जाऊ शकतो. कारण फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही.
अॅड. असिम सरोदेंनी तिसरी शक्यता व्यक्त केली आहे, की पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून १६ आमदारांना थेट अपात्र करण्याचा निर्णय स्वतः घटनापीठच घेईल. घटनेतील कलम १४२ मध्ये याची तरतूद आहे. कारण बहुमत चाचणीचे आदेश देण्याची राज्यपालांची कृती ही घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते.
चौथी शक्यता व्यक्त करताना अॅड. सरोदे म्हणतात, हे प्रकरण क्लिष्ट आहे. त्यामुळे संविधानपीठ १० व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची शक्यता आहे. मात्र ही शक्यता फार धुसर आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वातील घटनापीठच महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष येत्या दोन दिवसांत निकाली काढण्याची शक्यता अधिक आहे.

First Published on: May 10, 2023 9:24 AM
Exit mobile version