राज्यातल्या 271 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, निवडणुकीतही भाजपाच नंबर वन

राज्यातल्या 271 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, निवडणुकीतही भाजपाच नंबर वन

राज्यतल्या 271 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून निवडणुकीत भाजपाच नंबर वन पक्ष ठरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये सुद्धा भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

राज्यात 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात ठिकठिकाणी काल मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविले असून भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजपा–शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात सत्ताबदल होऊन भाजपा–शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : बीएमसीवर कब्जा केल्यानंतर भाजप शिंदे गटाला कुठे सोडून देतील कळणारही नाही, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल


 

First Published on: August 5, 2022 7:09 PM
Exit mobile version