वळकी नदीवरील साकव धोकादायक

वळकी नदीवरील साकव धोकादायक

सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर खुर्द येथील वळकी नदीवरील साकव ऐन पावसाळ्यात धोकादायक झाल्याने परिसरातील चार गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जा-ये करावी लागत आहे.१९८६ साली हा साकव बांधण्यात आला आहे. त्या नंतर २०१२-१३ व नंतर २०१६-१७ मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर काही दुरुस्ती झाली, परंतु त्यात लोखंडी साहित्याचा वापर करण्यात आला होता. सिमेंटच्या खांबांची मात्र दुरुस्ती झाली नसल्याने साकवाच्या दोन्ही बाजूकडील खांबांची पडझड झाली असल्याने धोका निर्माण झाला आहे.

संबंधित अधिकार्‍यांनी तात्काळ पाहणी करून त्याची दुरुस्ती करावी, अशी सिद्धेश्वर खुर्द रेलाची ठाकूरवाडी, आदिवासी वाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केली होती. याची दखल घेत तहसीलदार दिलीप रायन्नावार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, रायगड जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता दत्तू यांनी या धोकादायक साकवची पाहणी केली. यानंतर दुरुस्तीच्या सूचना तहसीलदारांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात मोटरसायकल व कार अशी वाहने जाऊ शकत नसल्याने गरोदर महिलेस बाळंतपणासाठी, तसेच आजारी व्यक्तीला डोली करून उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी आणावे लागत आहे. 2017 साली ग्रामस्थांनी या धोकादायक साकवाबाबत मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांनी दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला होता. पुलासाठी प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे.

First Published on: July 24, 2019 4:42 AM
Exit mobile version