महिन्यापूर्वी पडलेले गंधक अचानक पेटले

महिन्यापूर्वी पडलेले गंधक अचानक पेटले

मुंबई-गोवा महामार्गावर महिन्यापूर्वी केंबुर्ली गावाजवळ ट्रक पलटी होऊन त्यातील गंधकाची पावडर रस्त्यालगत पसरली गेली. मात्र हे गंधक तसेच ठेवण्यात आल्याने रविवारी त्याला अचानक आग लागली. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

२२ जून रोजी रात्री १० च्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघातानंतर ट्रक तेथून नेण्यात आला, मात्र गंधक त्याच ठिकाणी पडून राहिले. औद्यागिक वापरासाठी असलेल्या या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने त्याने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना समजताच एकच तारांबळ उडाली. नदी आणि महामार्ग या दरम्यान पडलेल्या गंधकाने नदीला देखील धोका निर्माण होऊ शकत होता. या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सुरूवातीला हे गंधक धुमसू लागले व काही वेळाने त्याने पेट घेतला. त्यानंतर पोलिसांनी एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात येऊन ती त्यावर टाकण्यात आली व आग आटोक्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड हे देखील दाखल झाले होते.

First Published on: July 22, 2019 4:00 AM
Exit mobile version