डिकसळ शाळेत अज्ञाताचा उच्छाद

डिकसळ शाळेत अज्ञाताचा उच्छाद

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञात व्यक्तीने उच्छाद मांडला. त्याने मुलामुलींसाठी असलेल्या शौचालयाचे दरवाजे तोडून पाण्याच्या टाकीत फिनेल टाकले. या घटनेमुळे गावातील पोलीस चौकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत आणि नेरळच्या मध्यावर डिकसळ गाव वसलेले असल्याने कायम वर्दळ असते. तसेच राज्यमार्गालगतच ही प्राथमिक शाळा आहे. १ ली ते ४ थीपर्यंत असलेल्या या शाळेत गावातील, तसेच परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या रविवारच्या सुट्टीनंतर दुसर्‍या दिवशी शाळा उघडल्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना शौचालयाचे दरवाजे कोणीतरी तोडल्याचे लक्षात आले. तर शाळेच्या टाकीतील पाण्याला कसलातरी वास येत असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितल्यानंतर पाण्यात फिनेल टाकल्याचे लक्षात आले. त्यामुळे शाळेत घडलेल्या या प्रकारची माहिती शिक्षकांनी ग्रामपंचायतीला दिली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कृत्याचा ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला आहे. या घटनेमुळे डिकसळ गावात पोलीस चौकी हवी हा जुन्या मागणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

First Published on: January 9, 2020 1:41 AM
Exit mobile version