नगरसेविकेच्या घरातून दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

नगरसेविकेच्या घरातून दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

अटक

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या भाजप नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घरातून सोमवारी नऊ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरांनी लंपास केले होते. या प्रकरणी सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करून एका महिलेला अटक करण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे.

हर्षा सुरेश शितोळे, असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथे ज्योती किशोर गोसावी यांचा पार्थ बंगला आहे. सोमवारी बंगल्याचा दरवाजा उघडा असताना हर्षा शितोळे या महिलेने त्यांच्या घरातील नऊ तोळे सोने दागिने चोरले होते. परंतु तोंडाला रुमाल बांधला असल्याने पोलिसांना तपास करताना अनेक अडचणी आल्या. या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आल्यावर हर्षा सुरेश शितोळे, या महिलेने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित महिलेची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याचे कबुली दिली. यापूर्वीही या महिलेवर शहरातील विविध भागांत गुन्हे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

हे नऊ तोळे सोने कामाक्षी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्सचे मालक देवराय गणपती रेवणकर यांनी विकत घेतले आहे. त्यांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोनचे प्रवीण मुंढे, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग शिवाजी पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनावणे, श्रीकांत दगडे, यशवंत ओंबळे यांनी केली आहे.

First Published on: May 18, 2018 9:56 AM
Exit mobile version