खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार

राज्यातील कलाकार आणि नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

या बैठकीनंतर राज्यातील नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी आणि विभागांना तात्काळ देण्यात आले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. यामुळे कलाकारांबरोबरच या क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रण येत असल्याने राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी केली होती. पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला होता. पण अखेर आज राज्य सरकारने नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिल्याने कलाकार व मनोरंजन क्षेत्राबरोबर संबंधित कर्मचारांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य़ात नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी विस्तृत चर्चा झाली. या चर्चेअंती येणाऱ्या काळात नाट्यगृहे दुरुस्ती आणि सुरुवात कशी करता येईल यावर विचार करत, ५ नोव्हेंबरपासून म्हणजेच जागतिक रंगभूमी दिनापासून राज्यातील नाट्यगृहांमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग सुरु होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी आहे. दीड महिन्यानंतर रसिक प्रेक्षकांनाही नाटकांची परवणी घेता येईल. असेही कांबळी यांनी म्हटले आहे.

First Published on: September 3, 2021 7:03 PM
Exit mobile version