राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता?, योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता?, योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

 मुंबई – महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे- फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील जनतेला या योजनेतंर्गत 10 रुपयांत जेवण तर कोरोना काळात 5 रुपयात जेवण मिळत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्यात 1 लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहे. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते. याची संख्या 2 लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आला. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

 काय आहे शिवभोजन थाळी ? –

गरिबांना, गरजूंनाा सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र  स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते.

First Published on: September 26, 2022 12:35 PM
Exit mobile version