तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे आमच्यावर मर्यादा – मुख्यमंत्री

तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे आमच्यावर मर्यादा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तीनही पक्षातील काही आमदारांनी छुपी नाराजी व्यक्त केली आहे. विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला आहे. माझ्याकडे कुणाचीही नाराजी पोहोचलेली नाही. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे काही मर्यादा येतात, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच दोन-तीन दिवसांत खातेवाटप पुर्ण केले जाईल, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यपालांवर नाराजी नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्षा गायकवाड आणि के.सी. पाडवी यांना शपथविधीच्यावेळी झापल्यामुळे काही मंत्र्यांनी राज्यपालांवरची नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर ठाकरे यांनी मात्र या वादावर पडदा टाकला आहे. उत्साहाच्या भरात काहीजण आपल्या पालकांची किंवा देवतांची नावे घेतो. मात्र राज्यपालांना शपथ नियमांनुसार व्हावी, असे वाटत होते. कारण त्यानंतर काही लोक शपथविधीवर नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे शपथविधीनंतर वाद नको म्हणून राज्यापालांनी खबरदारी घेतली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

आम्ही भिंती रंगवत नाहीत

अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळविण्याबाबत उद्धव ठाकरे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ठाकरे म्हणाले की आम्ही जे काही करतो ते रोखठोक करतो. आम्ही वाद घालणे किंवा भिंती रंगवण्याची कामे करत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्याच्या भिंतीवर काही मजकूर लिहिला असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. या मजकूरामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती. यावरुनच ठाकरे यांनी भाजपला हा टोला लगावला.

मित्र पक्षांना आमंत्रण दिले होते

मंत्रिमंडळ विस्तारासाठी आघाडीतील घटक पक्ष असलेले राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांनी शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याची चर्चा सुरु होती. याबाबत ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही आमंत्रण दिले नाही, असे होणार नाही. मात्र मित्रपक्ष शपथविधीला का येऊ शकले नाहीत, याची चौकशी करु असेही सांगितले. तसेच मंत्रिमंडळात केवळ तीनच महिलांना संधी दिल्याबद्दल ते म्हणाले की, महिलांच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही असे होत नाही. महिला अत्याचाराच्या बाबतीत आम्ही कठोरातील कठोर कायदा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

First Published on: December 30, 2019 6:08 PM
Exit mobile version