Legislative Council elections : मुंबईत काँग्रेसचा उमेदवार नाही, धुळे-नंदूरबारमधून गौरव वाणी यांना उमेदवारी

Legislative Council elections : मुंबईत काँग्रेसचा उमेदवार नाही, धुळे-नंदूरबारमधून गौरव वाणी यांना उमेदवारी

मुंबई : येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मुंबईतील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी काँग्रेसने सोमवारी दिल्लीतून कोल्हापूर आणि धुळे- नंदूरबार या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.  या दोन जागांवर अनुक्रमे गृह राज्यमंत्री, विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि गौरव देवेंद्रलाल वाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी सतेज पाटील यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी येत्या १०  डिसेंबरला  निवडणूक होत आहे. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश असून शिवसेनेने येथून सुनील शिंदे तर भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे  ९७ तर भाजपचे ८१ सदस्य आहेत. विधान परिषद निवडणुकीत मुंबईतून पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला  ७८ मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा उमेदवार निवडून येण्यात अडचण नाही.

मुंबई महापालिकेत काँग्रेसचे अवघे २९ नगरसेवक आहेत. मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य नगरसेवक तसेच शिवसेनेकडील अतिरिक्त तसेच दुसऱ्या पसंतीची मते गृहीत धरूनही काँग्रेस उमेदवाराचा निभाव लागणे कठीण दिसत असल्याने काँग्रेसने मुंबईतून उमेदवार देण्याचे टाळले आहे. त्यामुळे विधान परिषदेतील सलग दोन टर्मनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना विधिमंडळाच्या बाहेर राहावे लागणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत  आज, मंगळवारी संपत आहे. उद्या, २४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर २६ नोव्हेंबर ही उमेदवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १० नोव्हेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होऊन १४ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

नागपूरमधून छोटू भोयर?

दरम्यान, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झाले नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक छोटू भोयर यांना   नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार

मुंबई : सुनील शिंदे ( शिवसेना), राजहंस सिंह (भाजप)

कोल्हापूर  :  सतेज उर्फ बंटी पाटील ( काँग्रेस),  अमल महाडीक (भाजप)

धुळे- नंदूरबार : अमरीशभाई पटेल (भाजप) गौरव वाणी (काँग्रेस)
अकोला-बुलढाणा-वाशीम  : गोपीकिसन बाजोरिया (शिवसेना), वसंत खंडेलवाल (भाजप)

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे ( भाजप)

First Published on: November 22, 2021 10:01 PM
Exit mobile version